लखनौ (वृत्तसंस्था) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान तथा माजी गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी शुक्रवारी बाबरी मशीद पतनप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने आपला जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी सीबीआयचे सर्व आरोप फेटाळून लावले.

आडवाणी यांनी आपल्या जबाबात म्हटले की, मी निर्दोष आहे. मी कोणत्याही घटनेत सामील नव्हतो. तत्कालीन केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मला अडकवण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी काल (गुरुवारी) दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला होता. त्यांनीही आपण निर्दोष असल्याचे म्हणत, घटनेच्या वेळी आपण घटनास्थळी नव्हतो. हे संपूर्ण प्रकरण राजकारण प्रेरित आहे. मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असे म्हटले आहे.







