पुणे (वृत्तसंस्था) – मागच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भल्या पहाटे पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती करत आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे पावणे सहा वाजता पुणे स्टेशन येथील मेट्रो कामाची पाहणी केली.
अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड येथे पहाटे सहा वाजता सुमारास मेट्रो कामाची पाहणी केली होती. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या प्रमाणे पहाटे सहा वाजताच्या सुमारास हजेरी लावली तशीच आजही पुन्हा पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी अजित पवार पोहोचले होते
अजित पवार यांच्या या धक्कातंत्रामुळे आधिकाऱ्यांची मात्र धावपळ उडाल्याचं पहायला मिळाले. अजित पवार यांनी पुणे मेट्रोचे काम कसं सुरु आहे याची माहिती घेतली. पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना अजित पवार यांनी यावेळी आवश्यकता त्या सूचना केल्या.
करोनाच्या संकटामुळे जगभरातील सगळ्याच प्रकल्पांना फटका बसला आहे. मेट्रोच्या कामावरही त्याचा परिणाम झाला होता. आता कामगार परत येत असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड करांना मेट्रोची सेवा वेळेत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, संचालक रामनाथ सुब्रमण्यम, अतुल गाडगीळ, गौतम बिऱ्हाडे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.