चोपडा (प्रतिनिधी) – येथील महावीर पतपेढीत १ लाख ८ हजार ३४२ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी बाजारपेठ शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र जैन व तात्कालिन पिग्मी एजंट व लिपिक प्रवीण जैन यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी दि. २४ रोजी रात्री अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना शुक्रवारी दि. २५ रोजी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
येथील महावीर पतपेढीच्या बाजारपेठ शाखेमार्फत अपोलो टायर्स चोपडाचे संचालक पोल्सन चाकुल्ली मंजली यांना १७ नोव्हेंबर २००६ रोजी दीड लाख रुपये नजर गहाण कर्ज मजरे होळ (ता.चोपडा) येथील गट नंबर १०२/३१ या मिळकतीवर बोजा बसवून दिले आहे. यानंतर पतपेढीने पोल्सन मंजली यांना कर्ज भरण्याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम मुख्य शाखेतील त्यावेळचे पिग्मी एजंट व लिपिक प्रवीण इंदरचंद जैन यांच्याकडे दिली आहे, असे सांगितले. यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यावर बाजारपेठ शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र जैन यांनी पतपेढीच्या लेटर पॅडवर ४ ऑगस्ट २०११ रोजी सही-शिक्यासह पत्र देऊन पोल्सन मंजली यांनी कर्जफेड केल्याने त्यांच्या गट नंबर १०२ पैकी प्लॉट नंबर ३१ चे क्षेत्र १५० चौरस मीटरवरील बोजा कमी करण्याबाबतचे पत्र चोपडा दुय्यम निबंधकांना दिले. त्यानुसार कर्जदाराच्या मिळकतीवरील बोजा कमी झाला.
दरम्यान, बोजा कमी करण्यापूर्वी कर्जदाराने १ लाख ८ हजार ३४२ रुपये प्रवीण जैन यांच्याकडे दिले होते. ही रक्कम नरेंद्र जैन व प्रवीण जैन यांनी कर्ज खात्यात जमा न करता स्वतः जवळ ठेऊन अपहार केला आहे. याप्रकरणी महावीर पतपेढीच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक अचल अग्रवाल यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्यात नरेंद्र चंपालाल जैन व प्रवीण इंदरचंद जैन (दोन्ही रा.चोपडा) यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास एपीआय मनोज पवार करत आहेत.