जळगाव(प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी दादर येथील चैत्यभूमिवर अभिवादनासाठी मुभा मिळावी. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) च्यावतीने २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने राज्य सरकाराने भिम अनुयायींना घरुनच ऑनलाईन अभिवादर करावे, असे फरमान काढले आहे. या निर्णयामुळे नाराजी पसरली असून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे आदी शासनाचे नियम पाळून ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमिवर अभिवादन करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सचिव भरत मोरे, तालुकाध्यक्षा रमा ढिवरे, महानगर युवा अध्यक्ष मिलिंद सोनवणे, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभा भालेराव, रोहीत गायकवाड, किरण अडकमोल, नरेंद्र मोरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.