जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संसर्ग कक्ष येथे गार्ड ड्युटी कर्तव्य पार पाडीत असतांना जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांना कोरोनाची लागण झाली असून ते जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे, हे गेल्या सात महिन्यांपासून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ‘कोरोना संसर्गजन्य कक्ष’ येथे अत्यंत निर्भीडपणे कर्तव्य पार पाडत होते.एप्रिल महिन्यामध्ये ‘कोरोना’ कक्षामध्ये कर्तव्य पार पाडण्यासाठी कोणी धजावत नसताना अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कोरोनाच्या प्रचंड भीतीच्या काळामध्ये कर्तव्य पार पाडले. नुकतेच कर्तव्य पार पाडले नाही; तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपले संपूर्ण एक महिन्याचे वेतन सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री कोविड सहायता निधी मध्ये दिलेले आहे.
दि. 16 नोव्हेंबर रोजी कोरोना कक्षातील गार्ड ड्यूटी च्या कर्तव्यातून विनोद अहिरे यांना कार्यमुक्त करण्यात आले असता, दि. 17 नोव्हेंबर रोजी त्यांना ताप आणि अंगदुखी त्रास जाणवू लागल्याने त्यांनी जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे ‘कोरोना’ चाचणी केली असता, त्यांची चाचणी पॉझिटिव आलेली आहे. ते जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
श्री अहिरे यांनी सांगितले की, गेल्या सात महिन्यांपासून कोरोना संसर्ग कक्ष येथे गार्डड्युटी कर्तव्य पार पाडीत होतो. प्रचंड काळजीही घेत होतो. तरीही शेवटी कुठेतरी गाफीलपणामुळे घात झालाच, आणि कोरोनाने खिंडीत गाठले. पण असो… आतापर्यंत फक्त कोरोनाला बघत होतो. कोरोनावर लिहीत होतो. परंतु आता प्रत्यक्ष त्याला शरीरामध्ये अनुभवत आहे. आणि त्याचे आव्हानही आम्ही स्वीकारले आहे. जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात त्यामध्ये शारीरिक व्याधी हेदेखील संकटच असते परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीला आपण किती आत्मविश्वासाने सामोरे जाऊन परिस्थितीवर विजय मिळवितो हे देखील तितकेच महत्वाचे आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा आहेत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे तसेच पोलीस प्रशासन पाठीशी आहेच, तसेच अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर हे देखील तब्येतीची चौकशी करून आत्मविश्वास वाढवीत आहेत.
लवकरच कोरोणावर मात करून नवीन पुस्तक लिखाणास सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की कोरोनाचा धोका/ संकट अजूनही टळलेलं नाह. त्याकरिता शासन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा स्वतः सुरक्षित रहा, कुटुंबाला सुरक्षित ठेवा, समाजाला सुरक्षित ठेवा, आणि पर्यायाने राष्ट्र सक्षम बनवा हीच विनंती असेही त्यांनी सांगितले.