जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाडी शिवारातून शेताच्या विहिरीवरून असलेले वायर, स्टार्टर, पेटी व इलेक्ट्रिक सामान असा एकूण १० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश रामदास चौधरी (वय-४५) रा. शेलवड, ता. बोदवड जि.जळगाव यांचे जामनेर तालुक्यातील वाडी शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांनी ठेवलेले १० हजार ५०० रुपये किमतीचे १२० फूट वायर, स्टार्टर, पेटी व इलेक्ट्रिक सामान असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने २१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते २२ मार्च सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चोरून नेला आहे. हा प्रकार लक्षात आल्यावर सतीश चौधरी यांनी तातडीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.