जळगांव (प्रतिनिधी) – केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात तसेच महागाईच्या मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी 26 मार्चला भारत बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून पक्षाच्या वतीने याच दिवशी दि. 26 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत जळगाव जिल्हा काँग्रेस भवन आवारात कोरोना चे नियम पाळून उपोषण करून पाठिंबा देण्यात येणार आहे.तसेच सर्व ब्लॉक अध्यक्ष या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमांवर मागील 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने सुरवातीला चर्चेचा देखावा केला, पण हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही. हे तीन काळे कायदे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बड्या भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचा सरकारचा डाव आहे. या कायद्यामुळे शेतीमालाला मिळणारा
हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असून खाजगी व्यापारी व उद्योजकांना शेतकऱ्यांची खुली लूट करण्याची मुभा मिळणार आहे. या जुलमी कायद्यांच्या विरोधात देशातील तमाम शेतकरी पेटून उठले आहेत. सुरवातीपासूनच काँग्रेसचा या आंदोलनाला पाठिंबा राहिलेला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर आंदोलने करण्यात आली. तसेच खासदार राहुल गांधी यांनीही पंजाब, हरियाणासह इतर राज्यात ट्रॅक्टर रॅली काढून शेतकरी आंदोलनात सक्रीय सहभाग दर्शवला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. 60 (साठ) लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देऊन कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. 100 पेक्षा जास्त दिवस लोटले तरी केंद्रातील कुंभकर्णी सरकारला जाग आलेली नाही.
तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे.महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र हिटलरशाही वृत्तीचे मोदी सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी 26 रोजी जिल्हा काँग्रेस भवन परिसरात उपोषण केले जाणार असून जिल्ह्यातील प्रमुख नेते व आजी,माजी आमदार खासदार,पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत जिल्हामुख्यालयी उपोषणास उपस्थित राहावे तसेच ब्लॉक अध्यक्षांनी या भारत बंद ला पाठिंबा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करावे असे आवाहन जळगांव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांनी केले आहे.








