अमळनेरात संस्थेची बदनामी केल्याचा ठपका
अमळनेर (प्रतिनिधी): एका नामांकित सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या सचिवाला २५ लाख रुपयांची खंडणी मागून, पैसे न दिल्यास संस्थेची फेसबुकवर बदनामी करणाऱ्या एका संशयिताला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादी अशोक हरी खलाणे (वय ६६, रा. चाळीसगाव) हे ‘महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळा’चे सचिव आहेत. संशयित आरोपी अनंत रमेश निकम (रा. अमळनेर) याने संस्थेच्या विरोधात एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित न करण्यासाठी आणि हे प्रकरण थांबवण्यासाठी आरोपीने २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. जेव्हा फिर्यादींनी खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला, तेव्हा अनंत निकम याने १५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान आपल्या फेसबुक प्रोफाइलवरून संस्थेबद्दल खोटी आणि बनावट माहिती असलेले व्हिडिओ प्रसारित करण्यास सुरुवात केली.
संस्थेला आणि संबंधित व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. नंतर मध्यस्थीमार्फत बोलणी झाली असता, त्याने ही रक्कम कमी करून ४ ते ५ लाख रुपयांची मागणी केली. “पैसे दिले तरच व्हिडिओ थांबवेन,” असा दम त्याने भरला होता. या सततच्या त्रासाला कंटाळून अशोक खलाणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:४८ वाजता आरोपी अनंत निकम विरुद्ध गुन्हा दाखल केला.
अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने हालचाली करत संशयित आरोपी अनंत रमेश निकम याला ३१ डिसेंबर रोजी रात्री ८:४२ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करत आहेत.









