अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर न्यायालयातून कारागृहात नेत असतांना पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने हाताला झटका देऊन पळ काढल्याची घटना येथे घडली आहे.
राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी याच्यासह अन्य तीन आरोपींना काल शुक्रवार दिनांक २४ जून रोजी न्यायालयात पोलीस घेऊन गेले होते. यात पोलिस मुख्यालयात कार्यरत रमेश पंढरीनाथ सोनवणे, अनिल बद्रीनाथ पवार, राकेश बारकू काळे, भगवान आनंदराव सूर्यवंशी या चौघा पोलीस कर्मचार्यांनी आपल्या सोबत या चारही आरोपींना कोर्टात सादर करून नंतर ते पुन्हा जिल्हा कारागृहाकडे रवाना झाले. त्यांना शासकीय वाहन नसल्यामुळे ते बसने न्यायालयात आले होते. तसेच ते बस स्थानकाकडे निघाले.
दरम्यान, बस स्थानकावर पोहोचल्यावर आरोपी दादू धोबी याने पोलिसांना झटका देऊन पळ काढला. या वेळी अनिल पवार व राकेश काळे यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी दादू धोबी हा पोलिसांना सापडला नाही. यामुळे या प्रकरणी आता अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादू धोबी हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्यानेच पलायन केल्यानंतर खळबळ उडाली आहे.