मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे.
शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसेच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे दिसत आहे. याबद्दल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली असून ‘खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत’ असा आरोप केला आहे.
‘अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकत आज ईडीने कारवाई केली. त्यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा झपाटाच लावला आहे. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत ‘
सिल्व्हर ओक हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याचं नाव आहे तर वर्षा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्याचं नाव आहे. त्यामुळे भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच आरोप केले आहेत.
दरम्यान, गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झाले होते . शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली.
१६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे.