मुंबई (वृत्तसंस्था) – रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. त्यामुळे मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
आझाद मैदानात नेत्यांची भाषण झाल्यानंतर शेतकरी नेते अजित नवले, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि सचिन सावंत आदी नेते मोर्चेकऱ्यांसोबत राजभवनाकडे निघाले होते. या नेत्यांसोबत हजारो मोर्चेकरी लालबावटे घेऊन राजभवनाकडे निघाले. अचानक मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाल्याने पोलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ शेतकऱ्यांना अडवलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.







