रायगड (वृत्तसंस्था) – शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळ आलीच नसती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले. शेतकऱ्यांना अडचणीच्या वाटणाऱ्या कायद्यात केंद्र सरकारने दुरुस्ती करायला पाहिजे होती. मात्र, तसे न झाल्यामुळे ही वेळ आली, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
ते सोमवारी रायगडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाला आम्हा सर्वांचा पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच यावेळी जयंत पाटील यांनी जीएसटी थकबाकीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकारने अद्याप GST चे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे यंदा राज्याचा आर्थसंकल्प सादर करताना अडचण येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक राज्य भरडली जात आहेत. राज्य चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. आपलं दुकान कसे चालेल आणि इतर राज्ये कशी अडचणीत येतील, अशी मानसिकता केंद्र सरकारने ठेऊ नये, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला.







