मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोठ्या मोर्चाचं आयोजनक करण्यात आलं. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मात्र त्याचवेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांवरही घणाघाती टीका केली.
‘राज्याचा एक प्रमुख व्यक्ती म्हणून भेटण्याचे सौजन्य राज्यपालानी दखवायला हवं होतं. ती संवेदना राज्यपालांना हवी होती. महाराष्ट्राच्या राज्यपालांना अभिनेत्री कंगना रणौतला भेटण्यासाठी वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. महाराष्ट्रात आजपर्यंत कधी असले राज्यपाल नव्हते,’ अशा खरमरीत शब्दांत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, राज्यपाल आणि शेतकरी शिष्टमंडळ भेट होणार नाही. कारण राज्यपाल आज गोव्यात आहेत, ते मुंबईत रात्री उशिरा येतील. शिष्टमंडळ राज्यपाल यांच्या सचिवांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
या मोर्चात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फटकारलं आहे. ‘शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर उतरला आहे, पण पंतप्रधानांनी त्यांची चौकशी केली का? पंजाब शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा आहे का?’ असा सवाल करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे.







