पुणे (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झपाट्याने वाढ होत आहे. यातच पंढरपूर येथे पोटनिवडणूक पार पडली तिथे कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. याठिकाणी सगळेच राज्यकर्ते प्रचाराला गेले होते. सत्ताधारी असो किंवा विरोधक दोन्ही पक्षांनी याठिकाणी हजारोंच्या संख्येने गर्दी करत प्रचार सभा घेतल्या होत्या. इथे या सभा आणि मेळावे पार पाडले त्यामुळे आता निवडणुकीनंतर पंढरपूरातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.


अशात पंढरपूर येथे कोरोना वाढला त्याला नागरिकच जबाबदार आहेत असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवारांनी सभा करून सगळं खापर मात्र लोकांच्यावर फोडलं आहे. पुण्यात अजित पवार काल (२४ एप्रिल) पत्रकारांना म्हणाले की, ‘आम्ही निवडणूक आयोगाने पंढरपूरात निवडणूक लावली म्हणून प्रचाराला गेलो, राज्य सरकारच्या हातात ज्या निवडणुका होत्या त्या आम्ही पुढे ढकलल्या’.
‘पण पश्चिम बंगाल,केरळ, आसाम, तामिळनाडू इथंही निवडणूक लावली त्यामुळे तिकडे जाऊन सगळेजण प्रचार करतच होते ना…कुंभ मेळ्यात लाखो लोकांनी स्नान केले होते. याला जबाबदार नागरिक आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक लावली त्यांना जबाबदार कसं धरणार…जी काही नियमावली ठरवली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून सभा आयोजित करावी असं आम्ही सांगितलं परंतु काहीजण मास्क लावत नव्हते, रुमाल लावायचे त्यांना आम्ही काय बोलणार?’, असं सांगत त्यांनी हात वर केले आहेत.







