जळगाव (प्रतिनिधी) – पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातून घरी परतत असतांना अचानक प्रकृती खालावली. तालुक्याच्या ठिकाणी त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना तरुणाचा मृत्यू झाला आहे. रोशन भैरू पवार ( वय २२ रा. पहूर ता.जामनेर) असे मयत तरुणाचे नाव असून या दुदैवी घटनेने त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
जामनेर तालुक्यातील पहूरपेठअंतर्गत आंबेडकर नगरातील रहिवासी रोशन पवार याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. पोलीस होण्याचे ध्येय उराशी बाळगून गेल्या दीड वर्षापासून रोशन याने पोलीस भरतीसाठी दिवसरात्र मेहनत घेवून तसेच धावण्यासह इतर गोष्टींची तयारी केली. पुण्यातील पोलीस भरतीच्या जागांसाठी त्याने अर्ज भरला. सोमवारी पुण्यात पोलीस भरतीसाठी त्याची मैदानी चाचणी होती. त्यासाठी रोशन हा रविवारी रात्री पुण्याकडे रवाना झाला.
सोमवारी त्याची भरती प्रक्रिया सुरु झाली. मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर रोशन याला अचानक जुलाब आणि उलटीचा त्रास सुरु झाला. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तेथील स्थानिक डॉक्टरांना दाखवून उपचार केले. यात थोडीफार प्रकृती ठिक झाल्यानंतर पोलिसांनी रोशन यास पुण्यातून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसवून दिले. रेल्वेत प्रवासात रोशन याने फोनवरुन मंगळवारी पहाटे पाच वाजता त्याच्या कुटुंबियांना प्रकृतीची माहिती दिली होती. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रोशन हा भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरला.
याठिकाणी त्याची अजूनच प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी भुसावळातील रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांनी रोशनला जामनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. याचठिकाणी रोशनची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली व त्याचा दुपारी उपचार सुरु असतांना रोशन याने जगाचा निरोप घेतला. रोशन याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ एक बहिण असा परिवार आहे. रोशनचे वडील मोलमजुरी करतात, कुटुंबात रोशन हाच हुशार होता, त्याचा मोठा भाऊ हा सुध्दा वडीलांसोबत मजूरी करतो.