जळगाव/धुळे/नंदुरबार ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या ४४ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचे शनिवारी (दि. २६) व रविवारी (दि. २७) पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सूत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांच्या या संघटनेच्या दोनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २६) रोजी सकाळी ११ वाजता महावितरणचे संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत यांच्या हस्ते होईल. महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून महानिर्मितीचे संचालक (वित्त) श्री. बाळासाहेब थिटे, महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात कंपनी व संघटनेसमोरील वाटचाल व आव्हाने, प्रस्तावित धोरणे व कायदे आदींवर विचारमंथन होणार आहे. तसेच ध्येयधोरणांसंदर्भात ठराव व चर्चा, पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा, कार्यशाळा, केंद्रीय कार्यकारीणी निवडणूक कार्यक्रम होणार आहे.
आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील पाठक, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश तळणीकर, संघटनेचे सरचिटणीस श्री. मनोज ठवरे, संघटन सचिव श्री. संजय खाडे, पुणे-बारामती परिमंडलाचे अध्यक्ष श्री. संजय चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विजय गुळदगड, सचिव श्री. सतीश फडतरे, विविध आयोजन समित्या, पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.