अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर बसस्थानक परिसरातून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे २ लाख ३० हजार रूपये किंमतीच गांजा पोलीसांनी जप्त केला आहे. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर बसस्थानक परिसरातून दोन व्यक्ती हे बेकायदेशीररित्या गांजाची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कोठावदे, पोहेकॉ किशोर पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील, मिलिंद भांबरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे, पोकॉ हर्षल पाटील, विलास बागुल यांनी गुरूवारी २२ डिसेंबर रोजी रात्री अमळनेर बसस्थानक परिसरात छापा टाकून सुमारे २ लाख ३० हजार रुपये किमतीचा १५ किलो ५६६ ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त केला आहे. या कारवाईत राधेश्याम रामसिंग पावरा रा. हिसाडे, ता.शिरपूर, जि. धुळे याला ताब्यात घेतले. तर दुसरा साथीदार सुरेश साहेबराव भदाणे रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि.धुळे हा पसार झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील राधेश्याम पावरा या संशयित आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.