नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करावा का या विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यसमितीची महत्वाची बैठकी आज दिल्लीमध्ये सुरु झाली आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवल्यानंतर, गांधी निष्ठावान सक्रिय झाले असून, त्यांनी राहुल गांधी यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा देण्याची मागणी केली आहे.त्यातच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. मिश्रा यांनी काँग्रेसचे भावी अध्यक्ष म्हणून थेट सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या मुलांची दावेदारीदेखील विचाराधीन असू शकते असा खोचक सल्ला काँग्रेसला दिला आहे.
काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी मिश्रा यांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसकडे अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे सांगत मिश्रा यांनी प्रियंका यांच्या मुलांचीही नाव भावी काँग्रेस अध्यक्षांच्या यादीमध्ये घेतली. ‘काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक पात्र उमेदवार त्यांच्या पक्षाकडे आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, रिहान वढेरा, मिरयाना वढेरा यांचा समावेश आहे. काँग्रेस ही अशी शाळा आहे जिथे मुख्यध्यापकांची मुलं पहिली येतात, हे काँग्रेसच्या सदस्यांनी लक्षात घेतले पाहिजे,’ अशी टीका मिश्रा यांनी केली. यासंदर्भातील ट्विट एका वृत्तसंस्थेने केले आहे.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूिपदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. पत्रात सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यावर प्रत्यक्ष टिप्पणी करण्यात आलेली नाही, मात्र जनतेशी संपर्कात राहणाऱ्या सक्रिय नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्राची सोनिया गांधी यांनी दखल घेतली असून अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. नेत्यांनी एकत्रितपणे नवा पक्षाध्यक्ष नेमावा, आपण ही धुरा सांभाळू इच्छित नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे.