दरवाजे, खिडक्या, टीव्ही, काउंटरची प्रचंड तोड – फोड
सावदा (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सावदा येथील गजानन हॉस्पिटलचे अज्ञात व्यक्तींनी आज शुक्रवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११. ३० वाजता दगडफेक व टॉमीने तोड-फोड करीत लाखो रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण व कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्मण झाले होते. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करीत आहे.
सावदा येथे डॉ. सुनील चौधरी यांचे प्रसिद्ध गजानन हॉस्पिटल आहे. आज शुक्रवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता ओपीडी सुरु झाली होती. काही नागरीक हे डॉक्टरांकडे तपासणीसाठी आले होते. सकाळी १० वाजता इम्रान शेख (वय-२८) नामक रुग्ण कुठल्यातरी प्राण्याच्या चावण्यामुळे गंभीर झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यावेळी डॉ. सुनील चौधरी यांनी त्याला तपासले. त्याचे हृदय व फुफुस काम करीत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. यामुळे नातेवाईकांनी रुग्णाला तेथून नेले.
काही वेळाने ११. ३० वाजता काही एक कारण नसतांना अज्ञात चार तरुण दवाखान्याजवळ आले. त्यांनी हातातील टॉमी तसेच मोठे दगड हॉस्पिटलवर फेकले त्यात त्यांनी दरवाजा, खिडक्या तसेच स्वागत कक्षाचे काउंटरच्या टेबलावरील काचा फोडून प्रचंड नुकसान केले. त्यांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न डॉ. चौधरी यांचे भाऊ अनिल चौधरी यांनी केला. मात्र, त्यांनी त्यांचा हात पिरगळून शिवीगाळ केली. तसेच रुग्णालयातील टीव्हीची प्रचंड तोड-फोड केली. यामुळे रुग्णालयातील कर्मचारी, इतर रुग्ण हे भयभीत झाले. आचानक काय घडले हे कोणालाच काही कळले नाही. डॉ. सुनील चौधरी यांनी सावदा पोलिसांना घटनेची माहिती दिली. एपीआय राहुल वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत, तोड – फोडीची पाहणी केली. याप्रकरणी उशिरा सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.