वॉशिंग्नट (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर गंभीर आरोप केलाय. भारत हा विषारी वायू सोडणारा देश असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. बेलमॉन्ट विश्वविद्यालयात राष्ट्राध्यक्षपदासाठी सुरु असलेल्या निवडणुकीच्या शेवटच्या अध्यक्षीय वादविवादात ट्रम्प यांनी ही टीका केली आहे. कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

अध्यक्षीय वादविवादामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्यावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्द्यावर आपले विचार मांडले. यावेळी पर्यावरणासंदर्भातील आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, रशिया आणि चीनवर निशाणा साधला. भारत, रशिया आणि चीन हे आपल्या देशातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्याउलट अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करणारा देश असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यासोबत ट्रम्प यांचा वादविवाद जवळपास ९० मिनिटे चालला. गेल्या ३५ वर्षाच्या तुलनेत आपल्या नेतृत्वात कार्बन उत्सर्जनाची स्थिती सर्वात चांगली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ‘आम्हाला अब्ज रुपये खर्च करायचे होते आणि आमच्याशी भेदभाव केला जात होता, म्हणून आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो’, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. जलवायू परिवर्तनाच्या मुद्द्यावर भारत, रशिया आणि चीनसारख्या देशांनी योग्य पावलं उचलली नसल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.
दरम्यान कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांची यादी पाहिली तर जगात सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये चीनचा पहिला क्रमांक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. तर भारत आणि युरोपिय संघ क्रमश: तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळं ट्रम्प यांच्या टीकेला आता त्यांचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.







