कल्याण (वृत्तसंथा) – वाढीव वीज बिलाविरोधात भाजपने कल्याणमध्ये आंदोलन केले. या दरम्यान, वीज बिलाची होळी करताना भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की, झटापट झाली. यावेळी आमदारांनी पोलिसांवर दपडशाहीचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
वाढीव वीज बिलाविरोधात राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी वीज बिलांची होळी करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर कल्याणमधील वीज वितरण कंपनीच्या तेजश्री कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्ते जमले.
शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, भाजप पदाधिकारी संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्यांनी सरकारविरोधात घोषणबाजी सुरु केली. याचवेळी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी करायला सुरुवात केली. मात्र, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वीज बिलाची होळी करायला मज्जाव केला.
यावेळी भाजप आमदार गायकवाड यांच्यासोबत पोलिसांची जोरदार झटापट झाली. संतप्त झालेल्या आमदारांनी पोलिसांवर दडपशाहीचा आरोप करत सांगितले की, ‘पोलिसांनी ज्या पद्धतीने आमच्यासोबत वागणूक केली ती चुकीची आहे. सरकारच्या माध्यमातून पोलीस यंत्रणाही करीत आहे. पोलिसांच्या माध्यमातून गुंडागर्दीचे, दादागिरीचे काम करत आहेत.’
‘आमच्या सरकारच्या काळात अनेक बॅनर जाळले. त्यावेळी भाजप सरकारने कोणाची अडवणूक केली नाही. हे सरकार गुंडगीरीचे, दडपशाहीचे आणि दादागिरीचे सरकार आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो’, असंही यावेळी भाजप आमदार म्हणाले.







