यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा महेलखेडी येथे कार्यरत असलेल्या प्राथ.शिक्षिका लेखिका, संवेदनशील कवयित्री जबिन शेख
यांच्या ‘नदी आणि मी’ या थीम कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा साहित्याक्षर प्रकाशन अहमदनगर आणि युनिटी बहुउद्देशीय संस्था यावल यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथे त्यांच्या राहत्या घरी अब्दुल रऊफ (निवृत्त प्राचार्य डॉ. जाकीर हुसेन कॉलेज यावल) यांच्या अध्यक्षतेखाली व जळगांव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.अशोक कोळी अहमदनगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ.संजयजी बोरुडे, यावलचे उर्दू बाल साहित्यिक रहीम रज़ा आणि एस.एम.अन्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिउत्साहात पार पडला. याप्रसंगी इंदिरा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुमताज व सलीम, प्रकाशिका क्रांती राऊत, अहमदनगर येथील कवयित्री रचना, कवयित्री सौ.जयश्री काळवीट(भुसावळ), साहित्यिक सुनील गायकवाड, स्मिता राणे, युनिटी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शरीफ,सचिव अरशदखान व पदाधिकारी तसेच काही साहित्यप्रेमी रसिक उपस्थित होते.
कुराण व नात पठन करून रजियाबी यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अध्यक्ष व सर्व मान्यवरांचा परिचय काळवीट यांनी करून दिला. सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.सर्वांनी कवयित्री जबिन शेख यांचा आपल्या भाषणातून गौरव केला.
डॉ.अशोक कोळी यांनी जबिन शेख या सशक्त कवयित्रीची तुलना मलाला हिच्याशी केली. जबिन यांच्या प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कवितेचे त्यांनी खरी कविता अशा शब्दात कौतुक केले.
डॉ.संजयजी बोरुडे यांनी जागतिक क्रांतीच्या इतिहासातले कवितेचे महत्व अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने ओघवत्या भाषेत विशद केले. क्रांतीची नांदी असलेली काचे इतकी पारदर्शक कविता या शब्दात त्यांनी जबिन यांच्या कवितेचा गौरव केला.
कवयित्री जयश्री काळवीट यांनी झाकले माणिक या शब्दात जबिन याचा गौरव केला. साहित्यिक सुनील गायकवाड, कवयित्री रचना यांनीही शुभेच्छा संदेश देताना कविता सादर केल्या. रहीम रज़ा, शेख जबिनच्या तीन कवितांचा उर्दूत उत्कृष्टपणे अनुवाद सादर केला.मनोगत व्यक्त करताना कवयित्री जबिन शेख यांनी त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडून सांगितला. या प्रवासाची साक्षीदार,सोबती त्यांची सखी नदी आहे असे त्यांनी सांगितले. सदर काव्यसंग्रह निर्मितीचे श्रेय त्यांनी विनम्रपणे डॉ.संजय बोरुडे, पती अरशदखान पठाण व कुटुंबियांना दिले. अध्यक्षीय भाषणात अब्दुल रऊफ यांनी उर्दू ही मातृभाषा असूनही जबिन यांनी मराठी भाषेत कविता लिहून शिवाय एका स्त्रीने ही कामगिरी करून एक उज्वल परंपरा निर्माण केली आहे असे गौरवोद्गार काढले.
आभार प्रदर्शन अरशदखान पठाण यांनी केले. अशा प्रकारे मराठी साहित्यविश्वात नक्कीच दखल घेतली जाईल अशा नदी आणि मी काव्यसंग्रहाचा छोटेखानी प्रकाशन सोहळा संपन्न झाला.







