जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव बसस्थानकात शिवशाही बस जात असतांना मागच्या बाजूला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना मध्यरात्री घडली. या धडकेत दुचाकीवरील दोन जण जखमी झाले असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नवीन बसस्थानकात २२ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शिवशाही बस क्रमांक (एम. एच. ०६, बी डब्ल्यू ०८९३) क्रमांकाची बस ही जळगाव बसस्थानकाच्या आवारात गेटमधून जात असताना कोर्टचौकाकडून स्वातंत्र्य चौकातकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच १९ डीएम ७६०६) वरील चालकाने भरधाव वेगाने येऊन बसच्या मागच्या भागात येऊन धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वारासह सोबत असलेला एक जण जखमी झाले. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत शिवशाही बसचालक धीरज प्रल्हाद पवार (वय-४३) रा. पोलीस लाईन, धुळे यांच्या फिर्यादीवरून २२ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.