मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. या निर्णयानंतर मराठा समाज आता पुन्हा एकदा आरक्षणासाठी नवा लढा उभा करण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर, लवकरच कोल्हापूरमधून रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात सोमवारी (२४मे) सकाळी १० च्या सुमारास एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी हजर असतील. या बैठकीच्या माध्यमातून संभाजीराजे समाजाची भूमिका जाणून घेणार असल्याने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरते.
कोल्हापूरातील बैठकीत मराठा समाजाच्या भावना आणि भूमिका जाणून घेतल्यानंतर संभाजीराजे समाधीस्थळावर नतमस्तक होतील. तसेच त्यानंतर संभाजीराजे राज्यव्यापी दौऱ्याला सुरवात करतील अशीही माहिती मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपला घरचा आहेर देत संभाजीराजेंनी जाहीर केले होते की, २७ मे रोजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केल्यानंतर आपण मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर त्यापूर्वी कोल्हापूरात देखील संभाजीराजेंची एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आता मिळत आहे. त्यामुळे या बैठकीकडे निश्चितच राज्याचे लक्ष असेल.

खरंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर संभाजी राजे हे सातत्याने सामोपचाराची भूमिका घेताना दिसले होते.’सध्याच्या घडीला कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आताच्या घडीला उद्रेक झाला तर त्याचा त्रास सामान्य माणसाला होऊ शकतो. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही’, असे संभाजी राजे यांनी सांगितले होते. मात्र, आता ‘आता आंदोलन काय असतं हे इतरांनी मला शिकवू नये. मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल’, असा आक्रमक पवित्रा संभाजी राजेंनी घेतला आहे.







