मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू आमदार रोहीत पवार यांच्यावर ट्विटरवर टीका केल्याने भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. बांद्रा सायबर सेल पोलिसांनी प्रदीप गावडे यांना सकाळी पुणे येथून ताब्यात घेतलं आहे. गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. गावडे यांचा मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील सायबर शाखेतर्फे जबाब नोंदवण्यात येत आहे.

‘माझी अटक हे राजकिय षडयंत्र आहे. मोठे लोक यात समाविष्ठ आहेत. मला 421 ची नोटीस द्यायला हवी होती. पवार कुटुंबिय जर एवढं घाबरत असेल तर त्यांनी गोविंद बागेत गोट्या खेळाव्यात’, अशी खोचक प्रतिक्रिया गावडे यांनी दिली.
दरम्यान, प्रदीप गावडे यांनी काल (21 मे) याबबात आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी आठ ते दहा दिवसांपूर्वी 54 जणांवर गुन्हा दाखल केला. त्याबाबतीत बरीच चर्चा झाली. मी ज्या 54 जणांवर गुन्हा दाखल केलाय त्यातील बरी जणांनी महिलांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं आहे. तर काहींनी महिलांना बलात्काराच्या धमक्या दिलेल्या आहेत. आपल्या पैकी ज्याला कुणाला त्याचे पुरावे हवे असतील त्यांनी मला वैयक्तिक भेटावे. मी तुम्हाला सर्व पुरावे देऊ शकतो’, असा आरोप गावडे यांनी केला आहे.
‘मी जेव्हा 54 जणांवर गुन्हा दाखल केला तेव्हा मला माहिती होतं, हेतू परस्पर माझ्यावर काहितरी कारवाई करण्यात येईल. मी अशा कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. मी 54 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांवर कोणत्या प्रकारचं प्रेशर आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्यादिवशी गुन्हा दाखल केला त्यादिवशी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझी तक्रार केली. त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी संबंधित ट्विट डिलिट केलं’, असं गावडे म्हणाले.
‘माझ्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रार देण्यात आली आहे. तसेच पुणे आणि मुंबईत माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण माझे जे ट्विट आहेत ते आक्षेपार्ह नाहीत. घटनेने जे मला स्वातंत्र्य दिलेलं आहे. माझ्या दोन ट्विटवर आक्षेप घेण्यात आला आहे’, असं प्रदीप गावडे म्हणाले.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोसीन शेख यांनी हिंदूंचा देव असलेल्या यमदेवाचा फोटो मॉर्फ करुन मोदींचा फोटो लावला होता. त्याबाबत माझं ट्विट होतं. मी कायद्याचा विद्यार्थी आहे. अजमेरच्या दर्गाच्या वेबसाईटवर जी माहिती होती तिच माहिती मी दुसऱ्या ट्विटमध्ये दिली होती. त्यावरुन माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे’, असं गावडे म्हणाले होते.







