मुंबई (वृत्तसंस्था) – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चक्रीवादळामुळे नुकसान झालेले आहे. शासनाकडून याठिकाणी नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई केली जात असल्याने भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा.पाहून त्यांना काय वाटले असते?,’ असा सवाल उपाध्ये यांनी विचारला आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ‘ ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं, त्या शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा सरकारने केली. गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरूनच पाहणीचे नाटक केले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही, आणि मुख्यमंत्र्यांना याचा पत्ताच नाही. आता मुख्यमंत्री आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याची खोटी आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनताच प्रश्न विचारेल, हे नक्की.’

मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा कोकणवासीयांना तडाखा बसल्यामुळे तीन दिवस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरे यांनीही तितक्याच खंभीरपणे उत्तरही दिले आहे. आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील दिवणगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत टीका केले आहे.







