नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. त्याचबरोबर जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. भारतातही दोन कोरोना प्रतिबंधक लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून, त्या लसींचे सध्या लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर मदतीसाठी ब्राझीलने हात पुढे केला होता. ब्राझीलला लस पुरवठा करण्यास भारतानेही परवानगी दिल्यानंतर राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचे छायाचित्र ट्विट करत भारताचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना भारताने आपातकालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर लसीची मागणी ब्राझीलने केली होती. तसे पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी पाठवले होते. भारताने देखील ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवण्यास सुरूवात केली. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत आभार मानले.







