चोरगाव, देवगाव, फुकणी, नंदगाव, नारणे, आव्हाणी,
दोनगाव परिसरातील गावकऱ्यांनी टाकला सुटकेचा निश्वास
जळगाव ( प्रतिनिधी ) – चोरगाव शिवारात गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस मंगळवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
14 फेब्रुवारी रोजी चोरगाव येथे मंगल विठ्ठल सोनवणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा बिबट्याने पडला. यापूर्वी 27 जानेवारी रोजी चोरगाव येथेच दोन वासरे बिबट्याने फस्त केली होती. आव्हाणी येथेदेखील गुरांवर हल्ला केला होता. सतत घडत असलेल्या घटनांमुळे नदीकाठावरील चोरगाव, नंदगाव, देवगाव, फुकणी, नारणे, आव्हाणी, दोनगाव या गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झालेले होते. शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जाण्यासाठी जीव मुठीत धरून जात होते. गुरे चारणाऱ्यांना बिबट्याची दहशत झाली होती.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे यासाठी जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार 15 फेब्रुवारी रोजी पिंजरा लावण्यात आला होता.
परंतु, बिबट्या सतत हुलकावणी देत होता. अखेरीस मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या आव्हाणी येथील नंदू बापू पाटील यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. बुधवारी सकाळी सहा वाजता आव्हाणी गावकऱ्यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांना माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आव्हाणी येथे धाव घेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले.
जळगाव उप वनसंरक्षक विवेक होशिंग से, सहा.वनसंरक्षक एस.के.शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एरंडोल दत्तात्रय लोंढे, अनिल साळुंखे वनपाल, एन. एन. क्षीरसागर, उमेश भारुळे, शिवाजी माळी, लखन लोकनकर, कांतीलाल पाटील, योगेश सोनवणे, विवेक देसाई (मानद वन्यजीव रक्षक जळगाव) कारवाई केली. याप्रसंगी यावेळी जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, सरपंच सदाशिव पाटील, रवींद्र पाटील शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
चोरगाव, देवगाव, फुकणी, नंदगाव, नारणे, आव्हाणी, दोनगाव परिसरात असलेला बिबट्याचा वावरामुळे माणसांना धोका होण्याची शक्यता असल्याने वन्य अधिकाऱ्यांना सांगून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलेला होता. या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे व विशेषकरून वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांचे मी, धरणगाव तालुका व पाणीपुरवठा व स्वछतामंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्यातर्फे आभार मानतो. – जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील