पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या मुक्ताईनगर-नांदगाव या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत तर काहींना अपंगत्व आले भविष्यातील अपघात टाळावेत म्हणून या महामार्गावर तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांनी केली आहे.
चाळीसगाव ते जळगाव हा राज्य मार्ग क्रमांक १९ चे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्गामध्ये झाले आहे. त्याबाबत राजपत्रही घोषित करण्यात आले आहे.अशोक बिल्डकॉमने हे काम केले असून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत होती.आता हा संपूर्ण रस्ता कॉंक्रिटचा झाल्याने या मार्गाचे स्वरूप पालटले आहे.राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने आणि रस्ता चांगला झाल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड वाढला असून प्रवासाचा वेळ वाचला असला तरी अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे.
पाचोरा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा वस्ती असून या वस्त्यांना हा रस्ता रोजच ओलांडून शहरात जाणे भाग पडते. म्हणूनच या रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून अनेक अपघात झालेले आहेत. जळगाव चौफूली, भारत डेअरी स्टॉप, नवगजा पुलाजवळील सारोळा रोड , जारगाव चौफुली, गाडगेबाबा नगर स्टॉप, महाराणा प्रताप चौक, कैलादेवी मंदिरापुढील चौक अशा विविध ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. भरधाव येणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांकडे जाणाऱ्या मार्गांची कुठलीच कल्पना नसल्यामुळे या वस्त्यांमधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आणि वाहनांवर ही वाहने आदळतात आणि भीषण अपघात घडतात. या ठिकाणी केवळ गतिरोधक न बसवता रंबल स्ट्रिप्स बसविण्याची मागणी संजय वाघ यांनी केली आहे. संबंधित अधिकारी आणि रस्ता निर्मिती करणाऱ्या कंपनीने याठिकाणी होणाऱ्या अपघातांची तात्काळ दखल घेऊन रंबल स्ट्रिप्स बसवावेत आणि भविष्यात होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध करावा असे आवाहन देखील संजय वाघ यांनी केले आहे.