नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संपूर्ण देशात करोनाने हाहाकार माजला आहे. बहुतांशी राज्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा देत 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या निर्णयामुळे आता आणखी दोन महिने गरीब आणि वंचित लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजने अंतर्गत मे आणि जून 2021 या महिन्यात गरीब लाभार्थी नागरिकांना ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. या योजनेमुळे जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळवून त्यांना त्याचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू आणि तांदूळ यासह एक किलो चणे देण्यात येत आहेत.
कोरोनाच्या काळात बहुतांश राज्यांनी लॉकडाउन केलेला आहे त्यामुळे अनेकांचे हातावरचे पोट असलेल्यांचे मात्र जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत अशा व्यक्तींना कोरोनाची झळ बसू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकार 26 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे.