नाशिक पोलिसांची कारवाई ;

सहा जणांना मुद्देमालासह अटक
जामनेर (प्रतिनिधी) – शहरातील पहुर रस्त्यावरील बंद पडलेल्या ज्योतीबाबा पेट्रोल पंपाच्या परीसरामध्ये बिनबोभाटपणे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अडुयावर गुप्त माहितीवरून चक्क नाशिक येथील पोलीसांनी रात्रीच्या दिड वाजेच्या सुमारास अचानक छापा मारला. यात सहा संशयिताना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह परिसरामध्ये जुगार,गावठी दारू, मटका व्यावसायाचे पेव फुटले आहे. कोरोनाचे वातावरण काही अंशी कमी होताच अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा पुर्वीप्रमाणे डोके वर काढले असून त्याचा सर्व सामान्यांसह शांतता प्रेमी जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या लेखी तक्रारी गृहमंत्र्यांसह वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आधीच पोहचल्या आहेत. त्याच तक्रारीची दखल घेऊन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाद्वारा कारवाई पार पडली.
कारवाईत ८ मोटार सायकल, जुगाराच्या साहित्यासह ४१ हजारावर रोख रक्कम असे सुमारे साडे तीन लाखाचा ऐवज पोलीसांनी ताब्यात घेऊन जुगारअड्डा चालविणारे व खेळणारे असे मिळुन सहा आरोपींना अटक करण्यात केली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणा-यांचे धांबे चांगलेच दणाणले आहेत तर स्थानिक पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा सुरू आहे. कारवाईत संशयित आरोपी विशाल प्रताप वाघ, अरूण चांगो नरवाडे, राहुल राजु माळी, दिपक पंढरी भोई, दिलीप विजय माळी, सुमेध अरुण जाधव सर्व रा. जामनेर यांच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाझ शेख करीत आहे.







