मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारच्या सततच्या वादात राज्यात बराच रेंगाळलेला निर्णय म्हणजे
विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा. याच पार्श्वभूमीवर, आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल कोश्यारी यांच्या सचिवांना ‘विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा हा निर्णय कधी घेणार आहात ?’ असा प्रश्न केला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हा निर्णय खोळंबून राहिला असून त्यावर भूमिका घेण्यात आली नसल्याचे पाहायला मिळाले आहे.
नाशिकच्या रतन सोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवांना याबाबत प्रश्न केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने ६ नोव्हेंबर २०२० मध्ये विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त आमदारांसाठी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीकडून प्रत्येकी ४ अशी एकूण १२ नावांची शिफारस यादी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा निर्णय का घेण्यात आला नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केलाय.
राज्य सरकारच्या शिफारस यादीतील १२ नावे
राष्ट्रवादी
1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला
काँग्रेस
1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला
शिवसेना
1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी