नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात एकीकडे कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच दुसरीकडे देशभरातून ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस)चे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. या आजारावर उपाय करण्यासाठी देशपातळीवर संशोधन सुरू आहे. मात्र, या आजारावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
जहाँ बिमार, वहाँ उपचार.. हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रो कंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावत औषधे वाटली जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागात हे अभियान अधिकपणे व्यापक करायचं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता ब्लॅक फंगसच्या नवीन आजाराचा सामना आपल्याला करायचा आहे. या नव्या स्ट्रेनला निपटण्यासाठी सावधानी आणि योग्य ती व्यवस्था करण्यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील फ्रंटलाईन वर्कर्सशी बोलताना सांगितलं. मात्र, यावरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं आहे
कोरोनानंतर उद्भवत असलेल्या ब्लॅक फंगस रोगावरील उपचारासाठी लवकरच टाळ्या अन् थाळ्या वाजवायची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचं कौतुक करण्यासाठी नागरिकांना टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचं आवाहन केलं होत. त्यावेळी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवल्या होत्या. त्यावरुनच, राहुल गांधींनी मोदींनी लक्ष्य केलं आहे.
मोदीजी, प्रशासनाच्या दुरवस्थेमुळेच केवळ भारतातच ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात कोरोना लशींचा तुटवडा आहेच, पण त्यासोबतच या नव्या महामारीच्या औषधांचाही तुटवडा आहे. त्यामुळे, या आजाराविरुद्ध लढण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळ्या अन् थाळ्या वाजविण्याची घोषणा करतील, असे ट्विट राहुल गांधींनी केलं.