नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी वाराणसी येथील आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलता बोलता अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या रडण्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु असतानाच एका अनोख्या भविष्यवाणीची आता चर्चा रंगली आहे.
पीएम मोदींचे रडणे नवीन विषय नसला तरी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी १७ एप्रिलला केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. संजय सिंह यांनी १७ एप्रिलला बोलताना म्हटले होते की, अजून थोड्या दिवसांची वाट पाहा. ते तुमच्यासमोर येतील. सध्या ते लाईट्स आणि कॅमेऱ्याची वाट पाहत आहेत. ते टीव्हीसमोर येऊन रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या मोदी भावूक झाले म्हणतील आणि बातम्या चालवतील.
संजय सिंह यांनी केलेला दावा खरा ठरला आहे. मोदींचे रडणे झाल्यानंतर संजय सिंह यांनी ट्विट करत १७ एप्रिलला काय बोललो याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे रोजी सिद्ध झाले. देशाला एका संवेदनशील आणि स्वच्छ मनाच्या माणसाची गरज आहे. स्वत: निवडणुकीच्या रॅलीमध्ये जाऊन कोरोना पसरवून नंतर रडण्याचे नाटक करेल अशा ढोंगी पंतप्रधानांची गरज नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलंय, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असेही मोदींनी म्हटले होते.