भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील आठवडे बाजाराकडे जैन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर किरकोळ कारणावरून एकाने दोघा भावांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने त्याच्या घरातून चाकू आणून एकावर गळ्यावर, कपाळावर, शरीरावर, वार करून गंभीर जखमी केले. याबद्दल भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप प्रकाश लवंगे (वय ३१, रा. पंचशील नगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो सेंटरिंग काम करून उदरनिर्वाह करतो. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तो आणि त्याचा भाऊ आठवडे बाजाराच्या परिसरात जैन मंदिराच्या दिशेने जात असताना त्यांनी संशयित आरोपी आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे, पंचशील नगर यास् सेंट्रींग प्लेटचे बाकी असलेले दोन हजार रुपये मागितले.
पैसे मागितल्याचा राग आल्याने आकाश इंगळे याने संदीप व त्याच्या भावाला शिवीगाळ केली. त्यानंतर आकाशने त्याच्या घरातून चाकू आणून फिर्यादीच्या कपाळावर, गळ्यावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान
फिर्यादीच्या फिर्यादीवरून रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि हरीश भोये करीत आहेत.