चाळीसगाव (प्रतिनिधी) – कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाळीसगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण संख्येत अधिक प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत कोरोनावरील लस देण्यात आली नसल्याने ती तातडीने देण्यात यावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांना अध्याय पावेतो कोरोनावरील लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे ती लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे आज केली आहे. सद्यस्थितीत जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांची हॉटस्पॉट शहराकडे वाटचाल सुरू आहे. त्यात कडकडीत टाळेबंदीत राज्य परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. किंबहुना बजावत आहेत. तसेच जळगाव विभागातील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांना मुंबई बेस्ट उपक्रमातून वगळण्यात यावे अशी मागणीही आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे.
सद्यस्थितीत कोरोनाचा फैलाव होत असताना राज्यातील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी अविरत मेहनत घेत आहेत. प्रवाशांना सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली असल्याचे समोर आलेले आहे. त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. तसेच कोरोना आटोक्यात आल्यानंतर जळगाव विभागातील कर्मचारी बेस्ट सेवा देण्यास तत्पर राहिन असे देखील त्यांनी आश्वस्त केले आहे.







