जळगाव (प्रतिनिधी) – अजिंठा चौफुलीवर आज दुपारी लक्झरी बसने दुचाकीस्वाराला धडक दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
विनय रामचंद्र खडके (वय ५२ रा. जुने जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते कामानिमित्त ईच्छादेवी चौफुलीकडे जात असताना अजिंठा चौफुलीवर भरधाव वेगाने आलेल्या लक्झरी बसने त्यांना धडक दिली. ते रस्त्यावर जोरदार आपटले. त्यांच्या डोक्याला,पाठीला जबर मार लागला. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
विनय खडके यांच्या पश्चात वडील रामचंद्र, आई कमलबाई, पत्नी रोहिणी, मुलगा आतिष असा परिवार आहे. विनय खडके यांचे नुकतेच प्रमोशन झाले होते. ते पारोळा येथील कुटीर रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करत होते. धडक देणारी बेदमुथा कंपनीची लक्झरी बस एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आली आहे तर चालक विजय फत्रू सुरळकर (वय २५, रा. सामरोद ता.जामनेर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अजिंठा चौफुलीवर अपघात झाल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र तेथील वीस वर्षीय मजुरी करणाऱ्या सचिन कैलास भारुडे या तरुणाने विनय खडके यांना ओळखीच्या रिक्षामध्ये टाकले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले. रुग्णालयात आणल्यानंतर विनय खडके यांच्यावर वैद्यकीय पथकाने उपचार केले. त्या वेळी वैद्यकीय पथकासह तेथील कर्मचाऱ्यांशी विनय खडके हे बोलत होते. मात्र डोक्याला आणि पाठीला लागलेला जबर मार यामुळे त्यांचा तासाभरानी त्यांचा मृत्यू ओढवला, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.