मुंबई (वृत्तसंस्था) – देशासह अनेक राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. बँक, त्याच्या विविध शाखा, बँकेतील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येत आहेत. त्यामुळे बँका बंद करणे शक्य नाही. पण बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व ग्राहकांनी त्यांची कामे ऑनलाईन किंवा अॅपद्वारे करावी, असे आवाहन केले आहे.

याबाबत भारतीय बँक असोसिएशनने (IBA) बुधवारी सर्व बँक प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत देशभरातील बँकांना एकत्र लागू होईल, असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पण त्याऐवजी बँकेच्या सर्व शाखांमध्ये कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवठा जातील, याचा निर्णय राज्यस्तरीय बँकिंग समितीद्वारे (SLBC) घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
इंडियन बँक असोसिएशनच्या बैठकीत सहभागी झालेल्या एका बँकेतील अधिकाऱ्यानुसार, सध्या बऱ्याच ग्राहकांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडे डिजीटल पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना बँक स्टेटमेंट, अकाऊंट बॅलन्ससह इतर सर्व माहिती एक क्लिकवर मिळू लागली आहे. त्यामुळे कोरोना काळात ग्राहकांनी बँकेत न जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
इंडियन बँक असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, अनेक बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच आतापर्यंत 600 हून अधिक बँक कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मात्र बँका या अत्यावश्यक सेवेचा भाग असल्याने त्याचे कामकाज चालू ठेवणे बंधनकारक आहे.






