जळगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे असतात, याची कुणालाही कल्पना नसते. राज्याच्या विकासाचा प्रश्न सोडून ते राजकीय वचप्यासाठीच सभा आणि कार्यक्रम घेत फिरतात. भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचण्याचीच जबाबदारी त्यांच्यावर आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. ठाकरेंच्या सभेत घुसण्याचा इशारा देणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर राऊतांनी जहरी टीका केली. पळपुटे म्हणतात, ठाकरेंच्या सभेत घुसेन म्हणून. मी आता जळगावात घुसलोय. मला त्यांचा एक उंदीर दिसला नाही. आम्ही निधड्या छातीचे आहोत. नेते म्हणविणारे हे नुसते भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट आहेत. नुसती दाढी-मिशी असून चालत नाही.चांगल्या मिशा तर कुख्यात आतिक अहमदलाही होत्या. तुम्ही ‘गुलाबो गॅंग’ पाहिला का, असा सवाल करुन त्यांनी मंत्री पाटील यांना चिमटा घेतला.
रविवारी उद्धव ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर येत आहेत, त्यापार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत शुक्रवारी रात्री जळगावात आले. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली. आई असणाऱ्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार शिंदे गटाच्या आमदारांनी केला आहे. गुलाबराव पाटलांनी आमच्या सभेत घुसून दाखवावे, त्यांचा एकही उंदीर अजून दिसलेला नाही. आम्ही जंगलात खुलेआम फिरणारे जंगलातील वाघ आहेत, त्यांना मात्र भाजपाने कैद केले असल्याची टीकाहि खा. संजय राऊत यांनी केली.