जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत आता २१ पैकी १० जागांसाठी ४२ उमेदवार मैदानात उरले आहेत . ११ सोसायटी मतदार संघांमधून ११ संचालक बिनविरोध निवडले गेल्याने आता १० जागांसाठी मतदान होणार आहे
निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिलेल्या माहितीनुसार आता उद्या सकाळी या ४२ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे .
निवडणूक होत असलेल्या भुसावळ सोसायटी मतदार संघात २ उमेदवार असल्याने काट्याची लढत होणार आहे . रावेर , चोपडा व यावल सोसायटी मतदार संघात तिरंगी लढती होणार आहेत . महिला राखीव मतदारसंघातून ७ उमेदवार नशीब आजमावणार आहेत . अनुसूचित जाती – जमाती मतदारसंघातील ११ पैकी ८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता येथे तिरंगी लढत होणार आहे . विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून ८ उमेदवारांनी आज माघार घेतल्यानंतर २ उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे . इतर संस्था व वैयक्तिक सदस्य मतदारसंघातून ४ उमेदवार आता मैदानात आहेत . इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघातून ४ उमेदवार मैदानात आहेत.