एरंडोल ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारातील शेतातून एचपी पाण्याची मोटार व इतर सामानांची चोरी झाली आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश रमेश पवार (वय – ३४, रा. खेडगाव तांडा, ता.एरंडोल, जि. जळगाव ) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. तसेच ते गावाचे सरपंच देखील आहे. दरम्यान त्यांचे नागदुली शिवारात शेत आहे. या शेतात त्यांनी पिकांना पाणी भरण्यासाठी विहिरीवर पाण्याची मोटार लावलेली आहे. ही २० हजार रुपये किमतीची मोटार व लोखंडी सामान असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शेत शिवारातून चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या संदर्भात दिनेश पवार यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जुबेर खाटीक करत आहे.