पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील तरूणाचा पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेसमोर आल्याने तरुण ठार झाल्याची घटना गुरूवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाचोरा रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २० ऑक्टोंबर रोजी दुपारी १२:१५ वाजता रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७१ /२-४ दरम्यान अप लाईनवर एका युवकाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मालगाडीच्या लोकोपायलटने पाचोरा रेल्वे स्टेशन मास्टर अनिल प्रताप यांना दिली असता, ए. एस. आय. ईश्वर बोरुडे, शब्बीर शेख, पोलिस नाईक विलास जाधव, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असता मयताच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तपासा अंती मयताचे नाव सागर महाजन (वय – २३) रा. शिव कॉलनी, पाचोरा असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने सागर महाजन याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटने प्रकरणी पाचोरा रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सागर महाजन याचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे हे करीत आहे. सागर महाजन याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.