जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात तसेच इतर ठिकाणी घरफोडी, चोऱ्या करणारे दोघं संशयित आरोपींना एलसीबीच्या पथकाने जेरबंद करीत महत्वाची कामगिरी बजावली आहे.
पोनि. किरणकुमार बकाले यांना भुसावळ व पहूर पाळधी येथील काही तरुण जिल्ह्यात घरफोडी, चोरी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने जामनेर तालुक्यातील पहूर पाळधी येथून मोहित उर्फ आकाश नरेंद्र जाधव (वय-२२) याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र सिद्धांत उर्फ सोनू अरुण म्हस्के रा. रेल्वे कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ याच्या सांगण्यावरून वरणगाव येथील राजपाल ज्वेलर्स आणि दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. याबाबत दोघे संशयितांना वरणगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजार केले असता, तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये सपोनि. स्वप्नील नाईक, पोहेकॉ. सुनील दामोदरे, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पंकज शिंदे, परेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, मुरलीधर बारी यांचा समावेश होता.








