मुंबई (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सध्या फडणवीस ३ दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज देवगडमध्ये आहेत. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा टोला लगावला. मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले?
वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का? असा सवाल करतानाच गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.