जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील जळांद्री येथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथे स्थलांतरित पारधी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या समस्यांच्याविषयी चर्चा करून माहिती घेण्यात आली. याबाबत शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मुकेश साळुंखे यांनी दिली.
आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुकेश साळुंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी दि. २० मे रोजी ३ ते ४ किमी पायी चालत जाऊन जामनेर तालुक्यातील जळांद्री गावच्या परिसरात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या पारधी कुटुंबांची भेट घेतली. सदर भेटीत समाज बांधवांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले तरीही मूलभूत गरजांपासून आजही आपला समाज किती वंचित राहिला आहे हे भेटीत आढळून आले.
आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती समाज बांधवांना देण्यात आली. आपल्या समस्या मी शासन दरबारी मांडून समाज लवकरात लवकर विकसित कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुकेश साळुंके यांनी केले. यावेळी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे राज्य सचिव अमोल सूर्यवंशी, जामनेर तालुकाध्यक्ष मगन पारधी तसेच ज्ञानेश्वर पारधी, विजय पारधी, ईश्वर पारधी, गजानन पारधी आदी समाज बांधव उपस्थित होते.