जळगाव (प्रतिनिधी) – मुंबई येथील कुर्ला येथून मंगळसूत्र बनविण्यासाठी दिलेले काम पूर्ण न करता दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिराला भुसावळ येथील रेल्वे स्टेशनवर आरपीएफच्या टीमने रविवारी २१ रोजी मुद्देमालासह पकडले आहे. रेल्वे पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे. त्याच्याकडून २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत अटक करण्यात आली आहे. मालकाने पगार वेळेत न दिल्याने त्याने हा प्रकार केल्याचे दिसून आले आहे.
कुर्ला येथील मनोज मोहनलाल जैन (वय ५० ) हे मंगळसूत्र बनविण्याचा कारखाना चालवितात. त्यांच्याकडे कारागीर मंगळसूत्र बनवितात. शनिवार २० मे रोजी सकाळी १० वाजेनंतर त्यांनी कामगारांना मंगळसूत्र बनविण्याचे काम दिले होते. त्यात सुदाम निमाई समंता (वय २९, रा. बांदीपूर, हुगळी, पश्चिम बंगाल) याला ४९८ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिनेसह काम दिले होते. दुपारनंतर तो हे सोने घेऊन पसार झाल्याची फिर्याद त्यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार तपास सुरु होता.
भुसावळ स्टेशनचे निरीक्षक आर के मीना यांना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कुर्ला येथील अधिकाऱ्यांनी यांनी कळवले की, एक आरोपी कुर्ला पोलिस स्टेशनच्या हद्दीतून सोने चोरून पळून गेला आहे आणि तो हावडा येथे जात आहे. तशी माहिती कुर्ला पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश काळे यांनी इन्स्पेक्टर भुसावळ स्टेशन आणि डीएससीआर भुसावळ यांनाही दिली. संशयिताचे फोटोही पाठविले.
माहिती मिळताच विभागीय सुरक्षा आयुक्त भुसावळ व सहायक सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली गठित सीपीडीएस पथकाने उपनिरीक्षक के.आर.तरड, हवालदार श्रीकृष्ण कोळी, हवालदार विनोदकुमार गुर्जर आणि हवालदार इम्रान खान, हवालदार महेंद्र कुशवाह, हवालदार सागर यांना सूचित केले. भुसावळ येथे कार्यरत कॉन्स्टेबल दीपक शिरसाठ यांना हावडा जाणाऱ्या गाड्या आणि स्थानक परिसरात संशयास्पद व्यक्ती शोधण्याचे निर्देश देण्यात आले. या संशयिताचा शोध घेण्यासाठी उपरोक्त पथकाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. दुपारी साडेतीनच्या सुमारास भुसावळ स्थानकाच्या खांडवा बाजूच्या एफओबी येथे हवालदार श्रीकृष्ण कोळी यांना काळ्या रंगाच्या पिशवीसह एक संशयित व्यक्ती दिसला. जे संशयित आरोपीच्या फोटोशी मिळतेजुळते दिसत होते. पथकाने त्याला पकडून भुसावळ स्टेशन चौकीत आणले.
त्याने त्याचे नाव सुदाम निमाई समंता (वय २९, रा. बांदीपूर, हुगळी, पश्चिम बंगाल) असे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो एम. एम. ज्वेलर्स कुर्ला, मुंबई येथे दागिने कारागीर म्हणून काम करतो आणि त्याच्या मालकाच्या वागणुकीमुळे आणि पगार वेळेवर न दिल्याने नाराज होऊन त्याने वरील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्याला भुसावळ स्टेशनवर आरपीएफ टीमने २८ लाख रुपये किमतीच्या ४९८ ग्रॅम सोन्याच्या काळ्या मण्यांच्या साखळ्यांसह मुद्देमालासह पकडले आणि मुंबई येथील कुर्ला पोलिस यांचे ताब्यात दिले आहे.