पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुरंगी येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना रविवारी सकाळी घडली आहे. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुरंगी ता. पाचोरा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष चिंधा पाटील (वय – ४७) हे उन्हाळ्याचे दिवस असल्याने छतावरच झोपले होते. २१ मे रोजी पहाटेच्या सुमारास अंदाज चुकल्याने अचानक त्यांचा पाय घसरला व ते छतावरुन खाली पडले. सुभाष पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी सुभाष पाटील यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल भगवान बडगुजर हे करीत आहे. मयत सुभाष पाटील यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.