जळगावातील उपायुक्तांसह पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मंगल कार्यालयांमध्ये कुठल्याही प्रकारे कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येवून जळगाव शहरातील सहा मंगल कार्यालये सील करण्यात आले आहेत. यात दापोरेकर मंगल कार्यालय, यश लॉन, लाडवंजारी मंगल कार्यालय, क्रेेझी होम, निराई लॉन, कमल पॅराडाईज या मंगल कार्यालयांचा समावेश आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण समोर येत असल्याने महापालिका प्रशासन अँक्शन मोडमध्ये आले आहे. रविवारी 21 फेब्रुवारी या सत्रातील मोठी लग्नतिथी असल्याने महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत, राज्य शासनाने आखून दिलेल्या कोरोना नियमावलीचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालयांना सील ठोकले. या कारवाईवेळी महापालिकेच्या पथकाने मंगल कार्यालयातील वऱ्हाडी मंडळीला देखील बाहेर काढले.
या मंगल कार्यालयांवर झाली कारवाई-
महापालिका प्रशासनाच्या पथकांनी कारवाई केलेल्या मंगल कार्यालयांमध्ये, भुसावळ रस्त्यावरील कमल पराडाईज, पांडे डेअरी चौकातील दापोरेकर मंगल कार्यालय, पिंप्राळा रेल्वेगेट परिसरातील यश लॉन्स, एमआयडीसीतील बालाणी लॉन्स, खेडी रस्त्यावरील मिराई लॉन्स, आकाशवाणी चौफुली परिसरातील लाडवंजारी मंगल कार्यालय अशा अनेक मंगल कार्यालयांचा समावेश होता.








