नाशिक (वृत्तसंस्था) – नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या सख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्या रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत शहरात ही संचारबंदी असणार आहे, अशी घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. येत्या आठ दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर नाशिक शहरात कडक निर्बंध लागू करणार, असेही भुजबळ यांनी सांगितले.

नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात 534 रुग्ण वाढले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे नाशिक शहरात आढळले आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेगही वाढला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठोस उपाययोजना करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.
जर कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम तीव्र करु, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. यापुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करु, असे छगन भुजबळ म्हणाले.







