मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्याने यापूर्वी शरद पवार यांच्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी (२० एप्रिल) सायंकाळी शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना पुन्हा एकदा काल सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरून दिली आहे.
शरद पवार यांना नियमित तपासणीसाठी काल पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी गेल्या महिन्यात शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्यावर एन्डोस्कोपी करून त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ११ एप्रिल रोजी पुन्हा त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्तशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता.
पहिल्या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी विश्रांती घेत असताना त्यांनी हा डोस घेतला. यावेळी सुप्रिया सुळे, डॉक्टर लहाने उपस्थित होते. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली होती.







